माझ्या पत्रिकेत काही भाग्ययोग असावेत व ते 2010 वर्षी फळ देण्यास उद्युक्त झाले असावेत, म्हणूनच गुजराथ येथील श्री धन्वन्तरि देहोत्सर्ग स्थली पूज्य नानां बरोबर एक महिना राहण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. तिथेच नानांनी मला विधिवत् यज्ञासह श्री धन्वन्तरि मंत्राची दीक्षा दिली होती.
वेरावळ नजीक मोटी धणेज या गावाजवळ धन्वन्तरिंचे स्थान आहे, असे गुरुवर्य वैद्य नाना जोशी व गुरुवर्य वैद्य अनंत बाक्रे यांच्या वाचनात आले. त्यावेळी हे दोघे भूज,गुजराथ येथील विपश्यना केंद्रात विपश्यना करण्यास गेले होते. ही माहिती कळल्यावर कुतूहलापोटी हे दोघे वैद्यराज रस्ता बदलून राजकोट-जूनागढ-केशोद असा प्रवास करत विचारत विचारत मोटी धणेज येथे आले. तिथे धन्वन्तरिंचे देहोत्सर्ग स्थल आहे हे त्यांना कळले. हे धन्वन्तरि म्हणजे तृतीय अवतार काशीराज दिवोदास यांचे देहोत्सर्ग या स्थानी झाले. तिथेच तक्षकाची गुफा आहे व अन्य ही पौराणिक स्थल आहेत.
या पवित्र रम्य स्थानी काही दिवस जाऊन रहावे असा विचार दोघांनी केला व बरोबर मदतीला कोणी विद्यार्थी पाहिजे या विचाराने त्यांनी वैद्यराज सरदेशमुख सरांना विचारले. त्यांनी तिथे माझी योजना केली. त्या वेळी मी MD चे शिक्षण घेत होतो. त्या क्षणाला माझे आयुष्य बदलून गेले.
पूज्य ती. नाना, पूज्य ती. अण्णा बाक्रे व मी असे आमची टिकिटे काढली गेली. प्रवासाचा दिवस ठरला. परंतु वैद्य अण्णांचे ऐनवेळी काही कारणाने प्रवास रद्द करावा लागला. आणि फक्त वैद्य नाना व मी असे आम्ही दोघेच प्रवासाला निघालो. प्रवासात सतत गप्पा, आठवणी, चिकित्सानुभव सांगणे सुरु होते.
त्या प्रवासात आमचे आजोबा-नातु हे नाते पक्के झाले. आम्ही दोघे एकमेकांची काळजी घेत जूनागड हून केशोद गावी आलो. तिथे एक दिवस मुक्काम केला. नानांच्या आनंददायी स्वभावाने, विविध किस्से, घटना व आठवणी सांगणे यांत वेळ कसा जात होता ते कळतच नव्हते.
दुस-या दिवशी बसने आम्ही चोरवाड स्टेशन ला आलो. तिथुन छकडा (six seated) घेऊन अतिशय खराब रस्त्याने ठेचकाळत ठेचकाळत मोटी धणेज येथील श्री धन्वन्तरि देहोत्सर्ग स्थली आलो. तिथे बाजूला राहण्यासाठी प्रशस्त ओवरी व एक खोली होती. तिथे मंदिराचे पूजारी राहत होते. समाधि स्थलाजवळ मुक्तेश्वर महादेव मंदिर व मागे व्रजनी नदी आहे. आम्ही दोघांनी नदीत स्नान करुन सोवळे नेसून महादेवाची व धन्वन्तरिंची पूजा केली.
त्या मोकळ्या ओवरीतच आम्ही मुक्काम ठोकला.
हळुहळु गावात बातमी पसरली की दोन संन्यासी मंदिरात आले आहेत. कारण नाना व मी आम्बी धोतर वा सोवळ्यातच वावरत होतो. लोकं, मुलं आम्हाला बघायला यायला लागली. दोन तीन बायका माझ्याकडे बघून हळहळून बोलताना दिसल्या. बरं सगळे गुजराथीच बोलणारे व मला फार भाषा समजत नव्हती. पण नानांना ती भाषा समजत होती. ते खळखळून हसत म्हणाले, अरे त्या बायका म्हणतायत की किती लहान वयात हा मुलगा संन्यासी झालाय व या वयस्कर माणसाबरोबर रानोमाळ हिंडतोय. हे ऐकून आमची हसता हसता पूरेवाट झाली.
जेव्हा आम्ही सांगीतले की आम्ही संन्यासी नाही, आम्ही वैद्य डॉक्टर आहोत. तेव्हा हळुहळु अक्षरशः लोकांची रांग लागली. आणि नानांचा तिथे छोटेखानी दवाखानाच सुरु झाला. त्या ठिकाणी मी जे काही शिकलो ते आयुष्यभर पूरणार आहे. कमीत कमीत औषधात चिकित्सा कशी करावी. दूध,पाणी पाजून सद्यो वमन कसे करावे. रक्तमोक्षण कसे करावे. कारण आम्ही दोघच होतो, त्यावेळी सगळं आम्हालाच करावं लागायचं.
सकाळची पूजा, नदीवर स्नान, मग आलेले रुग्ण पाहणे, एकीकडे जेवण बनविणे, मग दुपारी गप्पा, संध्याकाळी परत स्नान, पूजा, फिरणे विविध लोकांना भेटणे, गप्पा मारणे, विपश्यना करणे असा आमचा दिनक्रम होता.
एक दिवस नाना म्हणाले आपण छोटा यज्ञ करु इथे. मग गावात सांगून पुजा-याकडून सामान आणले. लहान लहान काटक्या गोळ्या करुन समीधा जमविल्या, तूप आणले. सगळे गाव लोटले होते हे पाहायला. गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्ति व आम्ही दोघे असा चौघांनी यज्ञ केला.
यज्ञ झाल्यावर तिथेच धन्वन्तरि समाधि समोर अचानक नाना म्हणाले बस समोर माझ्या…विधिवत् हातात पाणी घेऊन संकल्प करत नानांनी मला कानात धन्वन्तरि मंत्र सांगीतला.
ते म्हणाले मी आयुर्वेद, पंचकर्म अनेकांना शिकविले पण मंत्र दीक्षा फक्त तुलाच देतोय. नित्य साधना कर, फार कुठे बोलु नकोस. मला नेहमी भेटायला यायचीही गरज नाही पण साधना नित्य चालु ठेव.
समाधि स्थलावर पूजा करतानाचा माझा फोटो पण त्यांनी काढला.
त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ७ दिवसात संपूर्ण सुश्रुत संहिता पारायण केले. मी वाचायचो व नाना ऐकायचे. आणि विशेष म्हणजे त्यावेळी एक मोर न चूकता तिथे जवळ येऊन बसायचा. पारायण संपले की उडून जायचा.
असे अत्यंत आनंदात, अभ्यासात तो महिना गेला. मध्ये आम्हाला भेटायला पंचकर्म महर्षी वैद्य कस्तुरे सुद्धा येऊन गेले. नाना अतिशय आनंदी, साधे सरळ, तपस्वी होते. त्यांच्याकडे पाहूनच खूप आधार वाटायचा.
नानांनी मला आयुर्वेदाकडे पाहायची एक वेगळी दृष्टी दिली. माझी चिकित्सा पद्धती तेव्हापासून सोपी सुटसुटीत झाली.
पुन्हा एकदा २०१२ वर्षी तिथे परत जाऊन आम्ही संहिता निरुपण केले…त्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम सुरु झाला. त्याची चौकशी पण नाना नेहमी करायचे.
नंतर ही नानांची अनेकवेळा भेट झाली. दरवेळी हळुच कानात विचारायचे की साधना चालु आहे ना?
आज नाना मला पोरकं करुन गेले, खूप मोठा मानसिक आधार गेला. आणि या कोरोना मुळे त्यांना बघायला ही जाता येत नाहीये. घरात बसून अक्षरशः मन आक्रंदत आहे.
पूज्य नानांचे प्रचंड कार्य, त्यांनी तयार केलेले अनेकानेक प्रतिथयश विद्यार्थी, त्यांच्यामुळे आत्मविश्वास मिळालेले माझ्यासारखे सामान्य विद्यार्थी, नानांच्या आठवणी…हाच खरा ठेवा आहे आता…
पूज्य नानांसारखेच साधे व्रतस्थ आयुष्य जगायचेय अशी इच्छा आज त्यांच्याच चरणी करतो.
– वैद्य अभिजित सराफ, नासिक