वैद्य कौस्तुभ पूरकर, पारनेर
एक संकल्प पूर्ण झाला..
विभागात काहीतरी करत बसलेलो आणि आदरणीय वैद्य श्रीप्रसाद बावडेकर सरांचा एक संदेश ‘वाॅट्स ॲप’ वर आलेला दिसला. ‘चरक निरुपण धनेज’ येथे सरांचे व्याख्यान होते. ‘चरक निरुपण धनेज’ .. अंगावर काटा आला कारण गेली नऊ ते दहा वर्षे येथे जाण्याचा संकल्प मनात धरुन होतो पण सिद्धीस जात नव्हता. यावेळेस संकल्प सिद्धी जाणवत होती. लगेच नोंदणी केली. पण पुढची अडचण उभी राहिली जायचे कसे? वैद्य मेघना बाक्रे यांना विचारले, तर त्यांचे पूर्वनियोजित असल्याने रेल्वेचे बुकिंग झालेले. आता परत आली का अडचण? ही बरेचदा आल्याने जाणे रद्द केलेले मी. यावेळेस मात्र ठरवलेले ‘अभी नही तो कभी नही’. काकांना फोन केला, तिकिटे काढली. जातानाचे RAC , येतानाचे एक waiting, म्हटले जाऊ. या आधीही पीजी सीईटी परीक्षांवेळी कसाही प्रवास केलेला. मग तयारी, चरकादि संहिता लागणार म्हणजे ओझे वाढलेच. त्यात थंडी. थोडे थोडे करत तीन बॅग्स झाल्या. जायचे होते २६ जानेवारीला. सकाळी वैद्य ऋतुजा कदम घरी आलेली. तिलाही पुण्यास जायचे होते. दुपारी भोजन करुन पडलो बाहेर. तोपर्यंत सर्व तिकिटे कन्फर्म झालेली. दूर्गेश म्हणाला तसा ‘तुम्ही चांगले काम करायला बाहेर पडलात की सर्व चांगलंच होतं’.संहिता ठेवलेल्या ‘पिठ्ठू’ ने रंग दाखवायला सुरुवात केली. तसे जास्तीच्या दोन मोठ्या पिशव्या ठेवलेल्या बरोबर. कसेबसे पुण्यात पोहोचलो. पुणे स्टेशनवर प्रतिक्षालयात एक श्री. कुलकर्णी आडनावाचे सद्गृहस्थ भेटले. त्यांच्याकडे अनेक वेगवेगळे अनुभव होते. नंतर आम्ही एकाच कंपार्टमेंट मध्ये असल्याने बराच वेळ त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकण्यात गेला. केवळ एका छोट्याश्या प्रवासी पिशवीवर निघालेले हे सद्गृहस्थ अहमदाबादेस पहाटे उतरले. गाडी वेरावळ ( सोमनाथ जवळ) ला दुसरे दिवशी संध्याकाळी चार पर्यंत पोहोचणार होती तर तोपर्यंत काय हा प्रश्न होताच पण गाडीत जुनागढ ला उतरणारा पुण्यातला चार मित्रांचा समुह कंपार्टमेंट होता. जुनागढ येईपर्यंत त्यांच्याशी गप्पा मारत सहज वेळ गेला. बरेच दिवसांनी एवढा लांबचा प्रवास तोही रेल्वेने मग काय गुजरातचे ‘सौराष्ट्र’ पाहत होतो. जुनागढला लांबूनच दिसणाऱ्या गिरनार पर्वतावरच्या दत्तगुरूंना मनोमन प्रणाम केला. शेवटी गाडी एकदाची पोहोचली वेरावळला. वेरावळला पोहोचल्यावर ‘सर’ – मँडम, वैद्य बावडेकर सर- मँम, वैद्य अभिजित सराफ, वैद्य गयाळ मँम , वैद्य मेघना ताई, वैद्य खोत मँम वगैरे आणि खास मित्रवर्य वैद्य ओंकार पाठक भेटले. सर्व एकत्र निघालो. मी, सराफ सर, ओंकार आणि वाघोलीचे पीजी विद्यार्थी एका सहा आसनी रिक्षेतून निघालो. मुक्कामाचे अंतर होते ३५ किमी. जाताना ‘चहापान’ झाले. पाऊण तासात सराफ सरांचे काही अनुभव – अवांतर गप्पा झाल्या. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथे लाईटच् नव्हते. मग चहा घेऊन नंतर वैद्य बावडेकर सर वगैरेंशी अवांतर गप्पा झाल्या. वैद्य बावडेकर सरांशी आधीची ओळख आभासी, प्रत्यक्ष आत्ता झाली. अभ्यासाचे प्रखर तेज जाणवत होते. नंतर तात्पुरती व्यवस्था दिली. निवासकक्षात ओंकार , वाघोलीचे पीजी होते. रात्री खास काठेवाडी जेवण होते. खिचडी – कढी- गव्हाची भाकरी- बाजरीची रोटी- बटाटा भाजी, जरासा झणझणीत. हे तीक्ष्णत्व कमी करायला ताक. सर- मँडम वगैरेंबरोबर बसून जेवलो. भरपूर गप्पा मारल्या. रात्री निवासकक्षात आलो. मग पीजी आणि गप्पा, त्यांचे प्रबंधांवर चर्चा केल्या. शेवटी जवळपास रात्री दीडला झोपलो. रात्री जेवणानंतर एक ताकीद होती की रात्री उशीरा हाॅटेलच्या उघड्या आवारात एकट्याने फिरायचे नाही अथवा रात्री खिडकी ही उघडायची नाही. कारण आपण गीर अभयारण्याच्या परिसरात आहोत. सिंह/ चित्ते/ बिबटे असतात. दुसरे दिवशी सकाळी आवरुन स्थायी निवासकक्षात आमची रवानगी केली. त्यानंतर काठेवाडी पद्धतीचे पोहे खाऊन सोमनाथला आम्ही काही लोक्स गेलो. सोमनाथ, सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रतिक. भव्य देवालय , सभोवती सिंधूसागर. ‘प्रथमो दैव्यो भिषक्’ रुद्राची आराधना करुन जगद्गुरू योगेश्वर श्रीकृष्णाचे दहोत्सर्ग स्थळ ‘गोलोक- प्रभासतीर्थ, संगम’ पहायला गेलो. रस्त्यातच लक्ष्मिनारायणाचे सुंदर मंदीर होते. तेथून जेवायला पुन्हा ‘शिवालिक’, मुक्काम स्थळी. भोजनानंतर धन्वंतरी आश्रमात मेघना ताई, विशालजी, ओंकार, हर्षल, दूर्गेश आदिंबरोबर गेलो. तिथे जाऊन निवांत काशिराज दिवोदास धन्वंतरींचे दर्शन घेतले. तिथेच मुक्तेश्वर महादेवाचेही स्थान. त्यासही आम्हाला सन्मति दे अशी प्रार्थना केली. नंतर पंचनागांपैकी एक तक्षक यांची गुहा आणि त्यांनी दंश केलेला वटवृक्ष, ज्याची वरची पाने वेगळी- पिवळी होती ते स्थळ पाहिले. अनेकविध औषधी पाहिल्या. नंतर परत आश्रमात आलो. काही इकडे तिकडे फिरुन नंतर मुक्तेश्वराची सायं आरती केली. सुंदरसे मोहकसे शिवलिंग, वर पंचमुखी नाग . ‘शिव के मन शरण हो’.ते होईपर्यंत अन्य लवाजमा आला. अदितीही आलेली. मग भोजन आणि परतीचा प्रवास. धन्वंतरि आश्रमात येताना ‘छकडा’ या खास सौराष्ट्री/ कच्छच्या वाहनातून आलेलो. जाताना टेंपोतून मागे उभे राहून. आता रोजचा प्रवास टेंपोंतूनच होणार होता. रस्त्यात येणारे झाडे चुकवत, धूळ, थंडी यांना सहन करत, अत्यंत विचित्र रस्त्यावरचा प्रवास सुरू .रात्री पोहोचल्यावर पुन्हा गप्पा, नवनवीन ओळखी आणि मग झोप.पहाटे पाचला उठून , आन्हीके उरकली. चुलीवर तापवलेल्या पाण्याने अंग शेकून काढले.कुडकुत घरुन आणलेला शिधा खात दिवसाचे झुंजूमुंजू झाले. अश्यातच काही विद्यार्थी येऊन बसले. मग निवासकक्षातच चरक संहितेवर ‘आमचे ‘ निरुपण सुरु. तेवढ्यातच ‘कौस्तुभ’… हाक आली, ‘ सर्व नीट?’ ‘हो सर’…
‘कल्याणमस्तु’.
परत विद्यार्थ्यांकडे.हा प्रघात पुढचे चार दिवस चालू होता.अर्धा तास चर्चा झाल्यावर ‘गाडी आ गयी हैं , चलो’ अशी वर्दी हरियाणवी आवाजात ‘हरिप्रिये’ ने दिली आणि निघाली सवारी. आपापले संहितांचे ‘पृष्ठिका’ सावरत. ‘युँही चला चल राही’.सकाळी पोहोचून दर्शन उरकून न्याहारी उरकली, मग पहिले सत्र. जे ऐकण्यासाठी कान अक्षरशः प्राण आणून ताठ झालेले, कधी एकदा ते ऐकतोय. ‘हं करुया सुरु?…पुढचा दीड तास, बस्स.. अमृतधारा कोसळत होत्या.त्या न्हाऊन चिंब होऊन सावरलो. मग चहा , नंतर सराफ सर.त्याआधीच्या सत्रात एक दोन संदर्भ सांगितल्याने सराफ सरांनी मला संदर्भांसाठी पुढे बोलावून घेतले.नंतर भोजन, भोजनानंतर वैद्य बावडेकर सर. हेतु- अनुक्त – द्रव्य- गुण यावर सुंदर आणि संवादात्मक विवेचन सरांनी केले. मध्येच कोट्या- हश्या यांनी सत्र जागे होते. नंतर मेघनाताईने सत्र घेतले.संध्याकाळी मग नदीच्या काठी शांत बसून तीच अनुभूती घेतली. नंतर आरती , चर्चा, जेवण – निवासावर आगमन मग पुन्हा चर्चा.दुसरे दिवशीही तेच, मात्र सत्र सुरु होण्यापूर्वी सराफ सरांनी हाक मारुन बोलावले. ‘आज- उद्या तू सरांसाठी वाचशील’ .बास..डोळ्यात पाणी आलं कारण तब्बल आठ वर्षांनी मी सरांसाठी सूत्र वाचणार होतो आणि ते ही धन्वंतरी आश्रमात. धन्वंतरीच्या सान्निध्यात प्रतिचरकाचार्यांसमवेत चरक वाचणे हे अजूनही शहारे आणणारे आहे.मग जसा सचिन तेंडूलकर लयीत येऊन खेळू लागतो तसे माझे झाले. पुढचे दीड तास माझ्यासाठी सर आणि मी आम्ही दोघेच होते. जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या. ‘ यह संहिता अध्यापक है तो यही फायदा हैं’. एक अचुक संदर्भ अगदी लवकर पकडल्यावर सरांनी थोपटलेली पाठ.ते सत्र झाले. नंतर वैद्य सौ. लिना बावडेकर मँमचे लेशोक्त वर उत्तम विवेचन झाले.भोजनानंतर सराफ सर व गयाळ मँम यांनी विषय मांडले.त्यानंतर चहा. चर्चा..बस चर्चा. सरांजवळ बसून चर्चा.जेवताना सर अचानक जवळ येऊन उभे राहिले. आम्ही सरांना खाली बसायचा आग्रह केला. सर समवेत बसले .जेवताना मुंबई येथील अध्यापक मित्रवर्य वैद्य सर्वेश यांनी सरांना वातव्याधीवर काही शंका विचारल्या. त्यानंतर जवळपास अर्धातास तरी तसेच ताटावर बसूनच आमचे श्रवण चालू होते.या दिवशीचे सकाळी वाचन झाल्यावर वैद्य बावडेकर सरांची प्रतिक्रिया उत्साहवर्धक होती. सरांबरोबर मी वाचन करतोय हे दिसल्यावर साहजिकच जरा भाव वधारला.त्या दिवशी रात्रीही दैवव्यपाश्रयावर सर्वेश, वैद्य रचना आणि अन्य विद्यार्थी यांबरोबर चर्चा झाली. याच दिवशी सकाळी बस्तिची कार्मुकता यावर NIA जयपूर, च्या विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली.तिसरे दिवशीचा न्याहारी पर्यंतचा उपक्रम तोच. नंतर सर..सत्र.’ यह संहिता के प्राध्यापक हैं और विशेष बात मेरे विद्यार्थी हैं’..धन्य धन्य. गुरुंनी समस्त लोकांना सांगणे की हा माझा विद्यार्थी. या उपर बहुमान तो काय?गद् गद् झालेलो.आजचेही सत्र नंतर वैद्य विनिश गुप्ता, वैद्य सराफ, वैद्य गयाळ, वैद्य मेघना ताई यांनी घेतले. मध्ये एका विश्रांती दरम्यान वैद्य विनिश गुप्ता सर , जे डेहरादून ला असतात ते स्वतःहून भेटले. चरक वाचनासंदर्भात त्यांनीही अभिनंदन केले. ते डेहरादून ला चरखेट / चरकदंडा येथे आयुर्वेद कौशलम् हा उपक्रम घेतात. काही वर्पांपूर्वी स्वतः ‘सर’ तिथे निरुपणार्थ गेलेलो. ‘ दो दीव्य ज्योतीओंका मिलन’.नंतर वैद्य बावडेकर सरांनी माझी खऱ्या अर्थाने ‘हजेरी ‘ घेतली. मोलाची कानउघडणी केली. यासर्वांच्या अनुभवावरुन वाटले की चला मी कुठेतरी ‘पात्र’ आहे.याउपर म्हणजे ‘सरांनी’ मेघनाताईला हे सांगितले की याला तयार करुन एक संधी दे. किती तो विश्वास.आयुर्वेदातला मी धुळीएवढा क्षुल्लक प्राणी आणि सर म्हणजे महानतम, त्यांनी या ‘नाचीज’ चा उल्लेख करावा, विश्वास ठेवावा यासारखे परम् सौभाग्य ते काय? तत् नंतर अंतिम दिवस. पहाटे लवकरंच अरुण रथ घेऊन येण्यापूर्वीच आमचे रथ आश्रमात धडकले. रात्री आवाहनादि झालेले. सकाळी स्वस्ति वाचन, मण्डलस्थापन, अग्निनिर्मिती, धन्वंन्तरी याग- आहुती आदि घनपाठासहित वेदोक्त विधी भजन-संकिर्तन-व्याकरणादि सेवेने पार पडले. तत्पश्चात ‘सरांच्या’ चरक ऊहन या पुस्तकाच्या गुजराथी भाषेत अनुवाद केलेल्या आवृत्तीचे प्रकाशन ‘उना ‘ येथील वैद्य पाचाभाई दमानिया, वैद्य रघुवीर जोशी, वैद्य प्रविण जोशी, वैद्य इनामदार यांच्या हस्ते झाले.वैद्य आत्रेयी (डाॅली) आणि वैद्य प्रतिक पांड्या यांनी गुजराथीत अनुवाद केलेला. तत्पश्चात अन्य वैद्यांची ओळख, भोजन , छायाचित्रीकरण …आणि परत मुक्कामाच्या स्थळी.आश्रमात ‘सरांच्या’ चरणावर मस्तक ठेवून सत्कृत्यासाठी आशीर्वाद मागितले. ‘कल्याणमस्तु’ ….एक फेब्रुवारीला संध्याकाळी पुन्हा सोमनाथाचे दर्शन ‘सरांबरोबर’ घेतले. मग अहमदाबाद. तिथे पुन्हा परतीचा प्रवास. तत्पूर्वी पुन्हा आशीर्वाद..नंतर पुण्यातून ओंकार आणि मी नगरला मध्यरात्री परतलो .हे सात दिवस आगळेच होते. एका वेगळ्याच लहरीत तरंगत होतो. एक विद्यार्थी ते एक शिक्षक हे एकदमच घडत होते. ज्ञान ग्रहणाचे अमूल्य सत्र सतत चालू होते. गेली दहा वर्षे जे मनात घोळत होते ते पूर्ण झालेले. माझ्या गुरुंबरोबर मला तिथे थांबायचे होते ते घडले. संकल्प सिद्धीस गेला. येताना एक गुरुमंत्रही मिळाला. यात काय नाही शिकलो? आयुर्वेद सोडून आणखी काहीच नाही सृष्टी. स्वतःला घडवणे, कोणत्या विषयावर नक्की लक्ष्य द्यायचे, आपली उद्दिष्टे कशी ठरवायची, शिक्षक हा अखंड विद्यार्थीच असतो आणि अहं कसा बाजूला ठेवायचा.यात अनेक क्षण मोलाचे होते, सुंदर अनुभव होते. चालणाऱ्या चर्चा, विशेषतः टेंपोत मागे उभे राहून वैद्य स्वप्निल , जो जयपूरचा विद्यार्थी , वाघोलीचे सर्व पीजी , अरुषी, दूर्गेश, हरिप्रिये, हर्षल आणि बरेच जण. घनपाठाने भारवलेले मन घेऊन, या अनुभवाचे गाठोडे गच्च बांधून गहिवरलेले आम्ही अजूनही परतलो नाहीच.तिथेच आहोत, खळाळत्या झऱ्याचा आवाज, नाचणाऱ्या मोरांचे केकारव, पक्ष्यांचा धुडगूस, मुक्तेश्वराच्या वाजणाऱ्या घंटा, आश्रमात ठेवलेले खोबरे-खडिसाखर आणिचालेल्या चर्चा. आयुष्यातली ही अनोखी गोष्ट. जपून वापरण्याजोगी. एखादे सौम्य अत्तर छान कुपीत ठेवून हळूवार हाताळून लावून सुगंध घेण्यासारखे हे क्षण.या प्रवासातले सर म्हणजे माझे गुरुवर्य आचार्य वैद्य श्री अनंत धर्माधिकारी सर. ज्यांचा कमी सहवास लाभूनही माझ्यावर अत्यंत लोभ, कृपाप्रसाद. ज्यांच्या चरणी लीन रहावे असे. सर एकदा विषय नक्की मांडेन आपणासमोर.माझ्या हातून सतत शास्त्र सेवा घडावी , हा प्रवास अव्याहत चालावा हीच प्रार्थना. जणू काही ‘ जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया’.. हा हात सोडू नका सर. निरंतर आशीर्वाद असावा.
बहुत काय लिहिणे.इति श्री..
पौर्णिमेयवैद्य कौस्तुभ किशोरकुमार पुरकरयुक्ति आयुर्वेद पारनेरप्रपाठक , संहिता सिद्धांतप्र.मे.ट्र,चे आयु.महा . शेवगावदि.०६/०२/२३माघ व.१